लोहमार्गालगत कुंपणामुळे उगांव परिसरातील शेतकऱ्यांची कोंडी रस्ते बंद,घराबाहेर पडणेही कठीण,रुग्ण – विद्यार्थ्यांची फरफट
समृद्धी महामार्ग धर्तीवर सर्व्हिस रोडची मागणी
न्यायभूमी
खेडलेझुंगे दि. १० फेब्रुवारी / बाबा गिते
मध्य रेल्वेच्या लोहमार्गालगत उभारण्यात आलेल्या लोखंडी कुंपणामुळे उगांव परिसरातील अनेक गावांमध्ये शेतीकडे जाणारे तसेच दैनंदिन वापरातील रस्ते बंद झाले आहेत.
परिणामी शेतकऱ्यांना त्यांच्या घरातून बाहेर पडणेही कठीण बनले असून शेतीकाम, पाणीपुरवठा,माल वाहतूक आणि शाळकरी मुलांची ये – जा गंभीरपणे प्रभावित झाली आहे.
रस्ते बंद झाल्याने काही ठिकाणी वृद्ध व आजारी नागरिकांना उपचारासाठी वेळेत पोहोचता न आल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत.
शेती लोहमार्गाच्या पलीकडे असल्याने मोठा फेरा मारावा लागत असून,काही भागांत थेट मार्गच उपलब्ध नसल्याने शेतशिवार अक्षरशः कुंपणात अडकले आहे.
हा प्रश्न केवळ उगांवपुरता मर्यादित नसून,रेल्वे मार्गालगतच्या जिल्ह्यातील शेतकरी,कष्टकरी व सर्वसामान्य नागरिकांनाही भेडसावत असल्याचे सांगण्यात येते.जिल्ह्यातील खासदार व आमदारांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा.
तसेच खासदारांनी संसदेत प्रश्न उपस्थित करून रेल्वे प्रकल्पासाठी जमिनींचे अधिग्रहण कशा स्वरूपात झाले?किती मोबदला देण्यात आला? आणि शेतकऱ्यांसाठी रस्त्यांची तरतूद आहे की नाही, याबाबत उत्तरे मागावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान,याबाबत तातडीने उपाययोजना न झाल्यास उपोषणाचे हत्यार उपसले जाईल असा इशारा दत्तात्रेय सुडके,दिपक पानगव्हाणे, अशोक सुडके,सीताराम मापारी,गंगाधर सुडके, अकिल शेख,मनीषा मापारी,समीर शेख, शांताबाई सुडके,साजिया शेख,मंगला सुडके, पुष्पा पाणगव्हाणे,शांताराम पाणगव्हाणे, शोभा, पानगव्हाणे आदींसह परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे.
“विकास आवश्यक असला तरी तो उपजीविकेवर घाला घालणारा नसावा.समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर लोहमार्गालगत सर्व्हिस रोड,भुयारी मार्ग किंवा आवश्यक ठिकाणी गेटची तातडीने व्यवस्था करण्यात यावी.
ब्रिटिश काळात रेल्वे प्रकल्पासाठी शेतजमिनी अधिग्रहित करण्यात आल्या;त्यावेळी योग्य मोबदला मिळाला नाही आणि आज रस्त्याअभावी शेती करणे अधिकच अवघड झाले आहे. दत्तात्रय सुडके, शेतकरी”



