महावितरणचे कार्यकारी संचालक (वितरण) अंकुर कावळे यांचे निर्देश
वीज ग्राहकांना अधिक दर्जेदार वीजपुरवठा द्या – अंकुर कावळे

न्यायभूमी
कोल्हापूर शनिवार, दिनांक ०३ ऑक्टोबर २०२६

कोल्हापूर जिल्हा महावितरणच्या महसुलाच्या दृष्टीने महत्त्वाचा असून, अल्पकाळासाठी खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचाही आर्थिकदृष्ट्या मोठा परिणाम होतो.
जिल्ह्यातील वीज ग्राहक नियमितपणे वीजबिल भरत असल्याने त्यांना अखंड व अधिक दर्जेदार वीजपुरवठा मिळण्यासाठी वीजवाहिन्यांची नियमित देखभाल व दुरुस्ती करावी. आपत्कालीन परिस्थितीत वीजपुरवठा खंडित झाल्यास तो कमीत कमी कालावधीत पूर्ववत करावा, असे निर्देश महावितरणचे कार्यकारी संचालक (वितरण) अंकुर कावळे यांनी दिले.
महावितरणच्या कोल्हापूर परिमंडलातील ऊर्जा शक्ति सभागृहात ‘जिल्ह्यातील संवेदनशील वीजवाहिन्या व त्यावर करावयाची कार्यवाही’ या विषयावर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर तसेच कोल्हापूर मंडलाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे उपस्थित होते.

३४ वीजवाहिन्या संवेदनशील; देखभाल-दुरुस्तीवर भर
कोल्हापूर जिल्ह्यात एकूण ७०६ अकृषक वीजवाहिन्या असून, त्यापैकी ३४ वीजवाहिन्या संवेदनशील प्रकारात येतात. गेल्या आर्थिक वर्षातील वीजवाहिन्यांमधून मिळणारा महसूल, वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण आणि त्याचा कालावधी या निकषांवर मुख्यालयाकडून या संवेदनशील वीजवाहिन्यांची निश्चिती करण्यात आली आहे.

देखभाल-दुरुस्तीसाठी वीजवाहिनी बंद करताना ऑनलाइन यंत्रणेत आवश्यक माहिती भरावी. देखभालीनंतर संबंधित वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा पुन्हा खंडित होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश कावळे यांनी दिले.
एबी स्विच, कंडक्टर बदल व रिंग फीडिंगवर भर
वीजपुरवठा अधिक सुरळीत करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी एबी स्विच बसवावेत, कंडक्टर बदलावे, लाईन क्रिंपिंग करावे, शक्य त्या ठिकाणी रिंग फीडिंगचा पर्याय उभा करावा तसेच गार्डिंग करावे, अशा सूचना देण्यात आल्या.
या उपाययोजनांमुळे महसुलातील तूट तसेच विद्युत अपघातांचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
बैठकीस कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कार्यकारी अभियंते व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.




