ओझरखेड कालव्याचे रब्बी आवर्तन ५ डिसेंबरला सोडा!
पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर कालवा कृती समिती आक्रमक; कार्यकारी अभियंत्यांना निवेदन

न्यायभूमी
लासलगाव दिनांक १८ नोव्हेंबर निशिकांत पानसरे
ओझरखेड कालव्यावरील गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा आणि उभ्या पिकांचा प्रश्न गंभीर होत असल्याने रब्बी हंगामातील आवर्तन तातडीने सोडण्याची मागणी ओझरखेड कालवा कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

यासंदर्भात पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत यांना नाशिक येथील कार्यालयात निवेदन देण्यात आले.
सावरगाव, सारोळे खुर्द, खडक माळेगाव, टाकळी विंचूर, पिंपळद, वाळकेवाडी, वाकी, वाहेगाव आदी गावांमध्ये पिण्याचे पाणी, जनावरांची तहान आणि अल्प प्रमाणात असलेली उभी पिके वाचविण्यासाठी ओझरखेड कालव्याचे रब्बी आवर्तन तातडीने सोडणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यासाठी कालवा सल्लागार समितीची तातडीने बैठक आयोजित करून ५ डिसेंबर रोजी पाणी सोडण्याचे नियोजन करावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.
याप्रसंगी निफाड पंचायत समितीचे माजी सभापती शिवा पाटील सुराशे, हनुमंत वाळके, भीमराज पवार, शंकरराव शिंदे, रेवन्नाथ शिंदे, ईश्वर शिंदे, चांगदेव शिंदे, भागुजी कुशारे, पंढरीनाथ पवार, बंडू जाधव, संतोष बोराडे, दत्ता मापारी, शरद शिंदे यांच्यासह विविध पाणी वापर संस्थांचे चेअरमन व शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांची पिके वाचविण्यासह ग्रामीण भागातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने मागणीची गांभीर्याने दखल घेऊन ५ डिसेंबरच्या आवर्तनाबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.



