दिवाळी आणि ग्रामीण पत्रकार: पब्लिसिटीचे शिल्पकार आणि राजकीय कृतघ्नतेचा अंधार
न्यायभूमी
लासलगाव दिनांक १२ ऑक्टोंबर
कैलास उपाध्ये
दिवाळी हा आनंदाचा, उत्साहाचा आणि आपुलकीचा सण. सर्वत्र फराळाची गोडी आणि आप्तेष्टांच्या भेटीगाठींचा आनंद सुरू असताना, समाजाचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या ग्रामीण भागातील पत्रकारांच्या वाट्याला मात्र बऱ्याचदा उपेक्षाच येते. वर्षभर नेत्यांच्या कारनाम्यांची, त्यांच्या विकासात्मक कामांची आणि प्रतिमेची विनासायास प्रसिद्धी करणाऱ्या पत्रकारांना सणासुदीच्या काळातही नेते साधे विसरत नाहीत, तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात, ही लोकशाहीतील अत्यंत दुर्दैवी आणि खेदजनक बाब आहे.
नेत्यांच्या यशाचे शिल्पकार आणि उपेक्षित पत्रकार
ग्रामीण भागातील पत्रकार हा गावखेड्यांच्या समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सामान्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम करतो. एवढेच नव्हे तर, स्थानिक पातळीवर छोट्या-मोठ्या नेत्यांना जनमानसात ‘हिरो’ बनवण्याचे, त्यांची पब्लिसिटी करण्याचे आणि त्यांना मोठे करण्याचे सर्वात मोठे श्रेय याच ग्रामीण पत्रकारांकडे जाते. पत्रकार आपल्या लेखणीच्या माध्यमातून नेत्यांची वाहवाही करतात, त्यांची कामे जनतेसमोर मांडतात. परंतु, जेव्हा सण-समारंभाचा किंवा दिवाळीसारख्या आनंदाचा प्रसंग येतो, तेव्हा हेच नेते पत्रकारांकडे ढुंकूनही पाहत नाहीत. छोट्या-मोठ्या जाहिराती देऊन पत्रकारांना आर्थिक बळ देण्याची साधी औपचारिकताही अनेक नेते टाळतात.
मानवतेची आणि आपुलकीची वेगळी वाट: दराडे यांचा आदर्श
राजकारणात कृतघ्नतेचे वारे वाहत असताना, काही मोजके नेते मात्र अपवाद ठरतात. मागील दिवाळीत लासलगाव-विंचूर परिसरातील पत्रकारांना दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा रूपी भेट म्हणून मिठाई आणि पैठणी देऊन कुणाल दराडे यांनी एक आगळावेगळा पायंडा पाडला. ग्रामीण भागातील अनेक बडे नेते, विशेषतः छगन भुजबळ यांच्यासारख्या दिग्गजांनी ग्रामीण भागातल्या पत्रकारांकडे संपूर्ण दुर्लक्ष केले, त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही.
अशा वेळी कुणाल दराडे यांनी मात्र पत्रकारांना विसरले नाही. त्यांनी अत्यंत आपुलकीने आणि यथोचित सन्मानाने पत्रकारांचा गौरव केला. हा सत्कार केवळ एका भेटवस्तू पुरता मर्यादित नव्हता, तर तो पत्रकारांच्या कष्टाची आणि योगदानाची घेतलेली योग्य दखल होती. पत्रकारांनी हा मान-सन्मान आणि आपुलकी आजही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवलेली आहे.
पत्रकारांच्या आत्मपरीक्षेची वेळ
ही केवळ एका नेत्याची किंवा गावाची गोष्ट नाही, तर संपूर्ण ग्रामीण पत्रकारितेचे हे वास्तव आहे. ज्या नेत्यांना पत्रकार आपल्या पेनच्या सामर्थ्याने शिखरावर पोहोचवतात, तेच नेते सत्तेत आल्यावर किंवा गरज संपल्यावर पत्रकारांकडे डोळेझाक करतात. ही वस्तुस्थिती आता ग्रामीण भागातील पत्रकारांनी गांभीर्याने समजून घेतली पाहिजे.
ज्यांनी कधीही पत्रकारांच्या हक्काची किंवा सन्मानाची साधी दखल घेतली नाही, त्यांच्या प्रसिद्धीसाठी अहोरात्र राबायचे का, याचा विचार पत्रकारांनी आता करायला हवा.
जे संकटकाळात किंवा सणासुदीला पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात, त्यांच्या आपुलकीची नोंद समाज आणि पत्रकारवर्ग नक्कीच घेत असतो.
केवळ नेत्यांच्या तालावर नाचण्यापेक्षा आपल्या लेखणीचा स्वाभिमान टिकवून, खऱ्या अर्थाने समाजहिताचे प्रश्न मांडणारे पत्रकारच समाजाचा खरा चेहरा असतात.
दिवाळी ही अंधारावर प्रकाशाची मात करण्याची पर्वणी आहे. मात्र, राजकीय कृतघ्नतेचा हा अंधार ग्रामीण पत्रकारांच्या आयुष्यातून केव्हा दूर होणार, हा एक मोठा प्रश्न आहे.
कुणाल दराडे यांच्यासारख्या नेत्यांनी दाखवलेला आदर हा इतर राजकारण्यांसाठी आरसा आहे. पत्रकारांनी आता स्वतःच्या आत्मसन्मानाचा विचार करण्याची आणि अशा कृतघ्न प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची वेळ आली आहे.




