लासलगाव महाविद्यालयात प्रथम वर्ष कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक धोरणावर उद्बोधन कार्यशाळा व विद्यार्थी स्वागत सोहळा संपन्न
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
लासलगाव दि २४ ऑगस्ट
लासलगाव येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लासलगाव येथे प्रथम वर्ष कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक धोरणावर (NEP) उद्बोधन कार्यशाळा पार पडली.
सदर कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अदिनाथ मोरे हे उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ.मोरे यांनी 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून प्रथम वर्षासाठी लागू होत असलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. नवीन शैक्षणिक धोरण ही देशातील एक ऐतिहासिक शैक्षणिक क्रांती असून नवीन पिढीसाठी हे एक वरदान ठरणार आहे असे त्यांनी प्रतिपादन केले. त्याचप्रमाणे महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या सोयी सुविधा असून विद्यार्थ्यांनी त्यांचा उपभोग घेतला पाहिजे . आपल्या जीवनाचे सार्थक करण्यासाठी व यशाचे अतिउच्च शिखर गाठण्यासाठी महाविद्यालयीन जीवन हे महत्त्वाचे असते असे त्यांनी प्रतिपादन केले. सदर कार्यशाळेसाठी व्याख्याते म्हणून महाविद्यालयातील कला व वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य तसेच भूगोल विभाग प्रमुख डॉ.सोमनाथ आरोटे यांनी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरणानुसार विषय निवडी संदर्भात तसेच नवीन शैक्षणिक धोरणाचा मूलभूत ढाचा कसा असणार आहे याबाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच या कार्यशाळेप्रसंगी मानसशास्त्र विभागाचे प्रा.किशोर अंकुळनेकर यांनी देखील विद्यार्थ्यांना क्रेडिट पॅटर्न पद्धतीला सामोरे जात असताना ऑनलाईन क्रेडिट कशाप्रकारे मिळवायचे तसेच एबीसी आयडी तयार करून क्रेडिट कसे साठवून ठेवायचे यासंदर्भात मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता सेलचे समन्वयक डॉ. संजय निकम यांनी विद्यार्थ्यांना विविध उपक्रम आणि महाविद्यालयातील सुख सुविधा यासंदर्भात मार्गदर्शन केले. महाविद्यालयीन शिस्तीला असलेले महत्त्व व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन परिसरातील आदर्श वर्तन कसे असावे यासंदर्भात लेफ्टनंट प्रा. बापू शेळके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी विभागाचे समन्वयक डॉ.विलास खैरनार यांनी सदर कार्यशाळेचे आयोजन केले.
सदर कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी मानसशास्त्र विभागाचे प्रा. किशोर अंकुळनेकर, राज्यशास्त्र विभागाचे प्रा. मारुती कंधारे तसेच मानसशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक विशाल गीते यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यशाळेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.


