प्रखर एलईडी हेडलाईट्सविरोधात कठोर कारवाई करा; खासदार भास्करराव भगरे यांची नितीन गडकरींकडे मागणी
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
न्यायभूमी
नासिक दि.०८ मे मुख्य संपादक
वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रखर पांढऱ्या एलईडी हेडलाईट्समुळे रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.या पार्श्वभूमीवर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्करराव भगरे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना सविस्तर पत्र पाठवून या समस्येकडे लक्ष वेधले आहे.
रात्रीच्या वेळी समोरून येणाऱ्या वाहनांच्या तीव्र प्रकाशामुळे चालकांची दृष्टी काही क्षणांसाठी बाधित होऊन गंभीर अपघात घडत असल्याने, केंद्र सरकारने यावर तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
अनेक वाहनचालक नियमांचे उल्लंघन करून अधिक क्षमतेचे ‘आफ्टर मार्केट’ एलईडी आणि हाय-बीम दिवे बसवत असल्याकडे खासदार भगरे यांनी पत्रात लक्ष वेधले आहे. विशेषतः पावसाळा, धुके आणि अंधाऱ्या रस्त्यांवर या पांढऱ्या प्रकाशाचा परावर्तित परिणाम अधिक धोकादायक ठरतो.
यामुळे ग्रामीण भागातील दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिक आणि पादचारी यांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून, निष्पाप नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी शासनाने हस्तक्षेप करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
खासदार भगरे यांनी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्र शासनाकडे विविध मागण्या केल्या आहेत. यामध्ये नियमबाह्य एलईडी दिव्यांविरोधात देशव्यापी विशेष मोहीम राबवणे, अनधिकृत दिव्यांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करणे आणि वाहनांच्या फिटनेस तपासणीवेळी हेडलाईट्सची सक्तीने तपासणी करणे यांचा समावेश आहे.
तसेच, एलईडी हेडलाईट्ससाठी एकसमान राष्ट्रीय मानके निश्चित करून वाहतूक पोलीस व आरटीओ विभागातर्फे संयुक्त तपासणी करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे.
वाहनचालकांमध्ये “लो-बीम वापरा, सुरक्षित प्रवास करा” या विषयावर व्यापक जनजागृती मोहीम हाती घेण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. रस्ते सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची बाब असून केंद्र सरकारने या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून तातडीने कठोर धोरणात्मक निर्णय घ्यावेत.
अशी आग्रही विनंती खासदार भास्करराव भगरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना केली आहे.



