लासलगाव–कोटमगाव रस्त्याच्या कामाची खासदार भास्कर भगरे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी
नागरिकांच्या तक्रारींची दखल; रस्त्याचे काम दर्जेदार व नियोजनानुसार पूर्ण करण्याच्या सूचना

न्यायभूमी
लासलगाव :दिनांक १० ऑक्टोंबर निशिकांत पानसरे
लासलगाव ते कोटमगाव रस्त्यावर सध्या सुरू असलेल्या रस्ते कामाबाबत नागरिकांनी केलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी आज प्रत्यक्ष स्थळावर जाऊन कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी सुरू असलेल्या कामाचा आढावा घेत कामाची गुणवत्ता, कामाचा वेग आणि निर्धारित निकषांची पूर्तता याबाबत सद्यस्थिती जाणून घेतली.
रस्त्याचे काम दर्जेदार, नियोजनानुसार आणि निर्धारित निकषांची पूर्तता करून पूर्ण करावे, अशा स्पष्ट सूचना खासदार भगरे यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक सूचना केल्या.
प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याची सूचना
लासलगाव–कोटमगाव रस्ता हा नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने रस्त्याचे काम योग्य गुणवत्तेचे होणे आवश्यक आहे. प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, यासाठी पायाभूत सुविधांची कामे विहित वेळेत, योग्य दर्जाने आणि ठरलेल्या नियोजनानुसार पूर्ण करणे गरजेचे आहे.
रस्त्याच्या कामात गुणवत्तेचे निकष पाळले जात आहेत का, काम निर्धारित वेळेत पूर्ण होणार आहे का आणि नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण कसे केले जाणार आहे, याकडे लक्ष देण्याची गरज या पाहणीच्या निमित्ताने अधोरेखित झाली आहे.
कामाच्या गुणवत्तेकडे नागरिकांचे लक्ष
रस्त्याच्या कामाबाबत स्थानिक नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर संबंधित विभागाने प्रत्यक्ष कार्यवाही करावी.
अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. खासदारांच्या पाहणीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामाच्या गुणवत्तेबाबत आणि तक्रारींच्या अनुषंगाने कोणती कार्यवाही केली जाते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करून रस्त्याचे काम दर्जेदार व सुरक्षित पद्धतीने पूर्ण करणे ही संबंधित यंत्रणेची महत्त्वाची जबाबदारी आहे.




