Breaking
महाराष्ट्र

विंचूर ग्रामपंचायतीचा अनोखा व शिस्तप्रिय उपक्रम; गावात वाजणार सायरन, स्वच्छता, अभ्यास अन् आरोग्यासाठी नियमावली जाहीर

टीव्ही-मोबाईल बंद; विंचूर ग्रामपंचायतीच्या अभिनव निर्णयाचे सर्वत्र कौतुक

1 3 2 5 1 8

न्यायभूमी

विंचूर (नाशिक) :दिनांक ३० ऑक्टोंबर सुनील क्षिरसागर 

विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल घडवण्यासाठी, त्यांच्यात अभ्यासाची गोडी निर्माण करण्यासाठी तसेच संपूर्ण गावात स्वच्छता, सुव्यवस्था आणि शिस्त लागावी या उदात्त हेतूने निफाड तालुक्यातील विंचूर ग्रामपंचायतीने एक अभिनव व कौतुकास्पद उपक्रम हाती घेतला आहे.

गावामध्ये दिवसातून चार वेळा विशिष्ट वेळेत सायरन वाजविण्यात येणार असून, या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांना कामाची सूचना, विद्यार्थ्यांसाठी अभ्यास वेळ आणि ग्रामस्थांसाठी विश्रांतीची वेळ निश्चित करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या या दूरदृष्टीपूर्ण निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

सायरनच्या वेळा व उद्देश पुढीलप्रमाणे:

सकाळी ७:०० वाजता (स्वच्छतेची साद): सकाळी ७ वाजता वाजणारा पहिला सायरन हा ग्रामपंचायतीच्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांसाठी कामावर रुजू होण्याची व दैनंदिन स्वच्छता मोहीम सुरू करण्याची अधिकृत सूचना असेल.

दुपारी २:०० वाजता (दुपारचे सत्र): दुपारी २ वाजता सायरन वाजवून सफाई कर्मचाऱ्यांना दुपारच्या सत्रातील स्वच्छता व नियोजित कामांवर हजर राहण्याची पूर्वसूचना दिली जाईल.

सायंकाळी ७:०० वाजता (अभ्यासाचा सायरन – परिवर्तनाची नांदी): हा सायरन सर्वांत महत्त्वाचा आहे. सायंकाळी ७ वाजता सायरन वाजताच गावातील सर्व घरांमध्ये टीव्ही आणि मोबाईल बाजूला ठेवून विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने अभ्यासाला बसावे, असा याचा मुख्य उद्देश आहे. पालकांनीही या वेळेत घरचे वातावरण अभ्यासपूरक ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

रात्री १०:०० वाजता (झोपेची व विश्रांतीची वेळ): रात्री १० वाजताचा सायरन वाजताच सर्व ग्रामस्थांनी आपली दैनंदिन कामे आटोपून वेळेवर शांत झोप घ्यावी, जेणेकरून सर्वांचे आरोग्य उत्तम राहील व गावात रात्रीची शांतता आणि सुरक्षितता राखली जाईल.

“आजचा अभ्यास, उद्याचे उज्ज्वल भविष्य“

गावातील भावी पिढीचे भविष्य उज्ज्वल घडवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. मोबाईल व टीव्हीच्या वाढत्या प्रभावातून मुलांना बाहेर काढून त्यांच्यात वाचनाची आणि अभ्यासाची गोडी रुजवणे अत्यंत आवश्यक झाले आहे. त्याचबरोबर गावात वेळेवर स्वच्छता आणि दैनंदिन शिस्त अंगीकारली जावी, यासाठीच हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे, असे ग्रामपंचायतीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

“चला, सायरनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करूया आणि आपल्या विंचूर गावाला स्वच्छ, सुंदर, शिस्तबद्ध व सुशिक्षित बनवूया! ग्रामस्थांचे सहकार्य हीच विंचूरच्या प्रगतीची खरी गुरुकिल्ली आहे,” असा विश्वास ग्रामपंचायत प्रशासनाने व्यक्त केला आहे.

विंचूर ग्रामपंचायतीचा हा आदर्श उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत असून, ग्रामस्थांकडून या निर्णयाचे भरभरून कौतुक केले जात आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 3 2 5 1 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे