खडक माळेगाव येथे मानव-बिबट संघर्ष, सर्पांविषयी जनजागृती व प्राथमिक उपचारांचे यशस्वी प्रात्यक्षिक
न्यायभूमी
विंचूर (नाशिक) :दिनांक ३० ऑक्टोंबर सुनील क्षिरसागर
मानव–बिबट संघर्ष टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना, वन्यजीवांसोबत सहजीवनाची गरज, सर्पांविषयी शास्त्रीय माहिती तसेच सर्पिदंशाच्या प्रसंगी करावयाच्या प्राथमिक उपचारांबाबत जनजागृती करण्यासाठी खडक माळेगाव येथील केरो बाबा मंदिराच्या प्रांगणात नूतन माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी व ग्रामस्थांसाठी एका विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
नाशिक पूर्व वन विभागाचे उप वनसंरक्षक राकेश सेपट, मनमाड सहाय्यक वनसंरक्षक शिवाजी सहाणे आणि येवला वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली येवला वन परीक्षेत्र कार्यालय व ए.आर.इ.ए.एस. फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा ‘मानव-बिबट सहजीवन व शून्य सर्पदंश जनजागृती कार्यक्रम’ पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात करताना वनपाल जयराम शिरसाठ यांनी विद्यार्थ्यांना बिबट्यांच्या नैसर्गिक वावरामागील कारणे, त्यांचे अधिवास, हालचालीचे मार्ग तसेच मानव–बिबट संघर्ष वाढण्यामागील कारणांची सविस्तर माहिती दिली. यानंतर वनरक्षक विंचूर विजय दोंदे यांनी ग्रामीण भागातील नागरिकांनी सुरक्षित वर्तनाच्या पद्धती अवलंबून मानव–बिबट संघर्षाच्या घटना कशा टाळता येतील, याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
शास्त्रीय माहिती व प्रत्यक्ष प्रात्यक्षिक:
ए.आर.इ.ए.एस. फाऊंडेशनचे संचालक व सर्प–वन्यजीव अभ्यासक सुशांत रणशूर यांनी मानव–बिबट सहजीवन, अन्नसाखळीचे महत्त्व आणि वन्यजीव संवर्धनाबाबत शास्त्रीय माहिती दिली. तसेच विविध जातींच्या सर्पांची शास्त्रीय ओळख करून देत विषारी व बिनविषारी सर्पांमधील फरक, त्यांचे वर्तन आणि सर्पदंश झाल्यास घ्यावयाची योग्य खबरदारी यावर प्रकाश टाकला.
यावेळी सर्पदंशानंतर घ्यावयाची तातडीची काळजी, अंधश्रद्धेतून केल्या जाणाऱ्या चुकीच्या उपचारपद्धतींमुळे होणारे दुष्परिणाम तसेच सर्पदंश झालेल्या व्यक्तीला त्वरित व सुरक्षितपणे रुग्णालयात पोहोचविण्याची प्रक्रिया याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांसमोर सादर करण्यात आले. या प्रात्यक्षिकाला उपस्थितांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
मान्यवरांची उपस्थिती व सहकार्य:
या मार्गदर्शन सत्रामुळे विद्यार्थी व ग्रामस्थांमध्ये वन्यजीवांविषयी जागरूकता, संरक्षणाची भावना तसेच आपत्कालीन परिस्थितीत योग्य पद्धतीने प्रतिसाद देण्याची क्षमता विकसित होण्यास मदत झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ए.आर.इ.ए.एस. फाऊंडेशनचे संचालक श्रीकांत फड, येवला वनपरिक्षेत्र विभागाचे आधुनिक बचाव पथकातील सदस्य अंकुश गुंड, भारत माळी, मयूर गांगुर्डे, तसेच स्थानिक सर्परक्षक मंगेश वाकळे, असिफ पटेल, श्रावणी देसाई, कांचन घोगरे आणि वैशाली गरुड यांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी खडक माळेगावचे सरपंच जगदीश पवार, माजी उपसरपंच विकास रायते, ग्रामपंचायत सदस्य शांताराम रायते, वाल्मीक राव येथे, रवींद्र शिंदे, विठ्ठलराव कन्हे, आप्पा शिंदे, नूतन माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक मंजुषा जाधव, रवींद्र गुंजाळ, सुभाष रायते, चेतन रायते यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.





