निफाडच्या नागापूरमध्ये ‘पट्टेरी वाघाची’ दहशत निघाली बनावट; ‘AI’च्या सहाय्याने अफवा पसरवणाऱ्या तरुणावर पोलिसांची कारवाई
सीसीटीव्ही फुटेजचा फोटो ‘AI Generated’ असल्याचे वनविभागाच्या तपासात निष्पन्न
न्यायभूमी
निफाड (नाशिक) : सुनील क्षिरसागर
निफाड तालुक्यातील नागापूर येथे घराच्या परिसरात पट्टेरी वाघ फिरत असल्याचे भासवणारा सीसीटीव्ही फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून नागरिकांमध्ये घबराट पसरवण्याचा खोडसाळ प्रकार उघडकीस आला आहे.
वनविभागाने केलेल्या तांत्रिक तपासणीत हा फोटो आधुनिक ‘एआय’ (Artificial Intelligence) तंत्रज्ञानाचा गैरवापर करून तयार केलेला बनावट (Fake) असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी सायखेडा पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेऊन कडक समज दिली आहे.

नेमकी घटना काय?
१० ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीपासून मौजे नागापूर येथील रहिवासी रामदास धोंडीराम टर्ले यांच्या घरासमोर पट्टेरी वाघ आल्याचे भासवणारे सीसीटीव्ही फुटेजचे फोटो व्हॉट्सॲपसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुफान व्हायरल झाले होते.
निफाड तालुक्यात बिबट्याचा वावर नियमित असला, तरी थेट पट्टेरी वाघ दिसल्याची बातमी पसरल्याने परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
तांत्रिक पडताळणीत फुटले बिंग
घटनेचे गांभीर्य ओळखून वनविभागाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळ व व्हायरल फोटोची तांत्रिक पडताळणी सुरू केली. फोटोची बारकाईने तपासणी केली असता, हे फोटो मूळ नसून ‘AI’ टूलचा वापर करून तयार केल्याचे उघडकीस आले.
नागापूर येथीलच रहिवासी अक्षय रामदास टर्ले या युवकाने खोडसाळपणातून हे बनावट फोटो तयार करून व्हायरल केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पोलिसांकडून कडक ताकीद
परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करून अफवा पसरवल्याप्रकरणी संशयित अक्षय टर्ले याला सायखेडा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.
पोलिसांनी त्याची कानउघाडणी करत भविष्यात असा खोडसाळपणा न करण्याबाबत कडक ताकीद दिली असून, याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाईची नोंद करण्यात आली आहे.
अफवा पसरवल्यास कठोर कारवाईचा इशारा
”नागापूर परिसरात पट्टेरी वाघ आल्याची माहिती पूर्णपणे खोटी आहे. नागरिकांनी अशा कोणत्याही खोट्या मेसेज किंवा फोटोंवर विश्वास ठेवून घाबरून जाऊ नये.
सोशल मीडियावर सत्यता न पडताळता अशा पद्धतीचे बनावट फोटो अथवा अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाईल.”
— वनविभाग व पोलीस प्रशासन




