वीज कर्मचारी संघटनेचे मुख्य अभियंत्यांना निवेदन; पारदर्शक नियुक्त्या आणि अतिरिक्त कामाच्या ताणाचा मुद्दा ऐरणीवर
महावितरणमध्ये कंत्राटी यंत्रचालकांच्या बदल्या करा; रिक्त पदे तातडीने भरा!
न्यायभूमी
नाशिक :वार रविवार दिनांक १८ ऑक्टोबर २०२६
महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेने महावितरण प्रशासनाकडे कंत्राटी यंत्रचालक व तंत्रज्ञांच्या बदल्या करण्यासह रिक्त पदे तातडीने भरण्याची जोरदार मागणी केली आहे.
याबाबत नाशिक परिमंडळाच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी नियुक्तीवर प्रश्नचिन्ह!
संघटनेच्या निवेदनानुसार, काही मंडळे व विभागांमध्ये कंत्राटी यंत्रचालक आणि तंत्रज्ञ अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. तीन वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या तातडीने कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
राजकीय शिफारशी नव्हे, गुणवत्तेला प्राधान्य द्या!
नवीन कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना राजकीय शिफारशींपेक्षा पात्रता, गुणवत्ता आणि तांत्रिक कौशल्याच्या आधारे पारदर्शक प्रक्रिया राबवावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
रिक्त पदे न भरल्याने कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण
बदल्या व पदोन्नतीमुळे रिक्त झालेली पदे न भरल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. वीजपुरवठ्याशी संबंधित कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी रिक्त जागा तातडीने भरणे आवश्यक असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
आता महावितरण प्रशासन काय भूमिका घेणार?
कर्मचाऱ्यांच्या बदल्या, गुणवत्ताधारित नियुक्त्या आणि रिक्त पदे भरण्याच्या मागण्यांवर महावितरण प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन ठोस कार्यवाही करावी.
अशी मागणी संघटनेने केली आहे. आता या निवेदनावर प्रशासनाकडून कोणती पावले उचलली जातात, याकडे संबंधितांचे लक्ष लागले आहे.




