सोनपावलांनी माहेरवाशीण गौरींचे आगमन; विंचूरमध्ये क्षीरसागर कुटुंबात महालक्ष्मी पूजन पारंपरिक उत्साहात संपन्न
तीन दिवसीय उत्सवात भक्तिभाव,देखणा शृंगार आणि लोकगीतांच्या जागरणाने परिसर दुमदुमला
न्यायभूमी
विंचूर (नाशिक) : दिनांक २० सप्टेंबर सुनील क्षीरसागर

भाद्रपद महिन्यातील अत्यंत मंगल आणि चैतन्यदायी मानल्या जाणाऱ्या तीन दिवसीय ज्येष्ठ-कनिष्ठ गौरी (महालक्ष्मी) पूजनाचा सण विंचूर येथील क्षीरसागर कुटुंबात मोठ्या भक्तिभावाने आणि पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला.

अनुराधा नक्षत्रावर घरोघरी सोनपावलांनी अवतरलेल्या या लाडक्या माहेरवाशिणींचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण परिसरात मंगलमय वातावरण निर्माण झाले होते.
पहिला दिवस : भाजी-भाकरीचा सात्विक नैवेद्य आणि थाटात आगमन
आगमनाच्या पहिल्या दिवशी पाच सुवासिनींच्या हस्ते औक्षण करून, मंगल घंटानादात गौरींच्या मुखवट्यांचे पूजन करून त्यांना घरात आणण्यात आले. पंचांग मुहूर्तानुसार संध्याकाळपर्यंत कोल्हापूरच्या अंबाबाईच्या पारंपरिक पद्धतीने साडी-चोळी, सोन्या-चांदीचे दागिने आणि सुवासिक फुलांच्या माळांनी देवींचे रूप अत्यंत देखणे सजवण्यात आले होते.

परंपरेनुसार पहिल्या दिवशी माहेरवाशीण गौरींना मेथीची भाजी आणि बाजरीच्या भाकरीचा साधा व सात्विक नैवेद्य दाखवण्यात आला.
दुसरा दिवस : पुरणपोळीचा महानैवेद्य, सुवासिनी भोजन आणि जागरण
उत्सवाचा मुख्य दिवस म्हणजे महालक्ष्मी पूजन. या दिवशी सकाळी विधिवत पूजा करून करंज्या, पुऱ्या, लाडू अशा विविध फराळाच्या पदार्थांसह पुरणपोळी, सोळा भाज्या आणि विडा असा शाही नैवेद्य अर्पण करण्यात आला.
घरातील सासरी गेलेल्या लेकी-सुनांना या सणानिमित्त खास माहेरी बोलावण्यात आले होते. दोन सुवासिनींना प्रत्यक्ष देवीचे रूप मानून त्यांना भोजन व मानपान देण्यात आला. श्रद्धाळू भाविकांनी मनोभावे साडी-चोळी व पुष्पहार अर्पण करून सुख-समृद्धीचे साकडे घातले. सायंकाळी महिलांचा हळदी-कुंकू व दर्शन सोहळा रंगला, तर रात्री भजने, पारंपरिक लोकगीते आणि फेर धरत महिलांनी उत्साहात जागरण केले.
तिसरा दिवस : दही-भाताचा नैवेद्य आणि भावपूर्ण निरोप
तिसऱ्या दिवशी लाडक्या माहेरवाशिणीला निरोप देताना वातावरण भावुक झाले होते. सकाळी दही-भाताचा नैवेद्य दाखवून महाआरती करण्यात आली. त्यानंतर पाच सुवासिनींच्या हस्ते गौरी हलवून उपस्थित महिलांना फुटाणे-खोबऱ्याचा प्रसाद वाटण्यात आला.

दुपारी पारंपरिक रीतीरिवाजानुसार नदीपात्रात गौरींचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले.


