वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणाऱ्या दोन महिलांपैकी एका महिला पोलिसांच्या जाळ्यात
; पोलिसांच्या वेळीच कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला
न्यायभूमी न्यूज
खेडलेझुंगे दि ०६ ऑगस्ट / बाबा गिते
लासलगाव ता.निफाड येथे वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणाऱ्या दोन महिलांपैकी एका महिलेस लासलगाव पोलिसांनी अटक केली आहे.
पत्रकार उमेश पारीख यांच्या तत्परतेमुळे आणि पोलिसांच्या वेळीच कारवाईमुळे हा गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले आहे.
दि. ४ ऑगस्ट रोजी दुपारी अडीचच्या सुमारास लासलगावच्या बाजारतळा जवळील सुकेणकर चाळीत ही घटना घडली.
इंदुमती दत्तात्रय काळे (वय ७५) या वयोवृद्ध महिला घरी एकट्या होत्या.
त्यावेळी दोन महिलांनी घरात प्रवेश केला आणि “केळी खा” असा बहाणा करत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला.
इंदुमतीबाईंनी नकार दिल्यावर एका महिलेनं बाहेर गस्त ठेवली आणि दुसऱ्या महिलेनं घरात घुसून त्यांच्याशी झटापट करत त्यांच्या गळ्यातील सुमारे २८ हजार रुपये किमतीची पोत हिसकावली आणि दोघी घराबाहेर पळाल्या.

घटनेचा आवाज ऐकून शेजारीच राहणारे टीव्ही ९ चे पत्रकार उमेश पारीख यांनी तात्काळ लासलगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स.पो.नि.भास्करराव शिंदे यांना माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.सांळुखे, पो.हवा.निचळ,गोसावी,म.पो.हवा.कदम, पो.शि.तळेकर आदींच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
उमेश पारीख यांच्या मदतीने पोलिसांनी तत्काळ कारवाई करत छाया आकाश कुऱ्हाडे (रा. सुमतीनगर,लासलगाव) हिला अटक केली. तपासा दरम्यान तिने गुन्ह्यातील दुसरी महिला तिची सख्खी बहीण पूजा प्रविण कुऱ्हाडे असल्याची कबुली दिली असून ती सध्या फरार आहे.
इंदुमती काळे यांचा मुलगा राजेंद्र काळे यांच्या तक्रारीवरून लासलगाव पोलिस ठाण्यात छाया आणि पूजा कुऱ्हाडे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०९ (४), ३ (५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.