फौजी ब्रदर्स ग्रुपने भविष्यातही अशाच सेवाभावी उपक्रमांची परंपरा कायम ठेवण्याचा संकल्प
न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
न्यायभूमी
लासलगाव दि.१७ जानेवारी सुनील पोळ

आर्मी डे (धर्मवीर दिन) निमित्त देशासाठी आपलं सर्वस्व अर्पण करणाऱ्या वीर जवानांना मानवंदना देत,लासलगाव येथील जय जनार्दन अनाथ व वृद्धाश्रमात माणुसकीचा स्पर्श देणारा मासिक अन्नदान सेवा उपक्रम अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला.
या उपक्रमाचे आयोजन फौजी ब्रदर्स ग्रुप यांच्या वतीने करण्यात आले होते.
या अन्नदान सेवेमध्ये आश्रमातील निराधार अनाथ मुले तसेच वृद्धांना सप्रेम भोजन देण्यात आले. त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं समाधान आणि आनंद पाहून उपस्थितांची मने भरून आली.
देशसेवेबरोबरच समाजसेवेचे पवित्र कर्तव्य जपत फौजी ब्रदर्स ग्रुपने राबवलेला हा उपक्रम सर्वांच्याच अंतःकरणाला स्पर्श करून गेला.
यावेळी एक भावनिक क्षण पाहायला मिळाला. सीमेवर देशसेवेचे कर्तव्य बजावत असल्यामुळे काही जवान प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत.
मात्र त्यांच्या धर्मपत्नींनी पुढाकार घेत त्यांच्या जागी उपस्थिती लावली आणि त्यांची जबाबदारी समर्थपणे पार पाडली.जवानांच्या अनुपस्थितीतही त्यांच्या कुटुंबीयांनी दाखवलेली ही सामाजिक बांधिलकी उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आणणारी ठरली.
“सेवाच खरी भक्ती आहे” या भावनेतून राबविण्यात आलेल्या या कार्यक्रमातून समाजात करुणा, माणुसकी आणि एकोप्याचा संदेश पोहोचला. गरजूंच्या चेहऱ्यावरचं हास्य हेच या उपक्रमाचं खरं यश असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
आर्मी डेच्या पवित्र निमित्ताने सैनिकांच्या त्याग,शौर्य आणि बलिदानाला वंदन करत,समाजासाठी काहीतरी देण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचं आयोजकांनी सांगितलं.
फौजी ब्रदर्स ग्रुपने भविष्यातही अशाच सेवाभावी उपक्रमांची परंपरा कायम ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.