लोणजाई माता गडावर सामुदायिक श्री दुर्गा सप्तशती पाठ सोहळा
त्र्यंबकेश्वर श्री स्वामी समर्थ गुरुकुलाचे चंद्रकांत (दादा) मोरे यांचे मौलिक हितगुज
न्यायभूमी : दि. २७ सप्टेंबर विशेष प्रतिनिधी सुनील क्षिरसागर विंचूर (नाशिक)
नवरात्र उत्सव व श्री ललित पंचमीच्या पावन मुहूर्तावर विंचूर येथील श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने,सुभाष नगर येथील लोणजाई माता गडावर सामुदायिक श्री दुर्गा सप्तशती पाठ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
या सोहळ्यात महिला व पुरुष सेवेकऱ्यांनी एकत्रितपणे सप्तशतीचे पठण करून देवीची आराधना केली.
सामुदायिक पठनात हजारो भाविकांचा सहभाग
शुक्रवार दि. २६ रोजी दुपारी १ वाजता श्री दुर्गा सप्तशती पठनास सुरुवात झाली. सुमारे दीड तास अखंडितपणे वाचन सुरू राहिले.
साधारण दुपारी २.३० वाजता त्र्यंबकेश्वर गुरुकुलातील प्रसिद्ध प्रवचनकार चंद्रकांत दादा मोरे यांचे हितगुज संपन्न झाले.या सोहळ्यात जवळपास पाच हजार महिला व पुरुषांनी सहभाग नोंदवला. माता गड परिसर भक्तांच्या गर्दीने अक्षरशः फुलून गेला होता.
मंदिराच्या गाभाऱ्यात, पायऱ्यांवर, सभोवतालच्या रस्त्यावर महिला सेवेकरी व भक्त भाविक उत्साहाने बसून वाचन करत होते.
चंद्रकांत दादा मोरे यांचे आध्यात्मिक मार्गदर्शन
आपल्या हितगुजात दादांनी जीवनोपयोगी धार्मिक आणि सामाजिक विचार मांडले.त्यांनी सांगितले की,“प्रति पौर्णिमेला सत्यनारायण पूजन केल्याने पती-पत्नीमध्ये कायम मनोमिलन राहते.

सोळा संस्कारांच्या परंपरेत हळदीकुंकू लावण्यामागे अध्यात्मिक महत्त्व आहे. त्याचप्रमाणे मंगळसूत्र, बांगड्या व जोडवे धारण करण्यामागेही धार्मिक व आरोग्यविषयक कारणे आहेत.”
याशिवाय दादांनी आरोग्य विषयक औषधींचा वापर,स्त्री-पुरुषांचे धार्मिक आचारविचार,तसेच कुलदेवता-कुलस्वामिनी पूजनाची पद्धत आणि त्यामागील तत्त्वज्ञान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांचे हितगुज श्रोत्यांनी मोठ्या भक्तिभावाने ऐकले.
भक्तांची उत्स्फूर्त उपस्थिती
लोणजाई माता गडावरील भव्य दिव्य रावळात महिलांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. निफाड तालुक्यातील विविध गावांतील श्री स्वामी समर्थ केंद्रातील महिला सेवेकरी,विंचूर पंचक्रोशीतील स्वामी सेवेकरी तसेच सुभाष नगर,विंचूर व निफाड परिसरातील सरपंच, उपसरपंच,ग्रामस्थ व भाविक या वेळी उपस्थित होते.
श्रद्धा,भक्ती आणि सेवाभावाचा संगम
हा सोहळा म्हणजे श्रद्धा,भक्ती आणि सेवाभावाचा संगम ठरला. महिला सेवेकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि पुरुष सेवेकऱ्यांचे सहकार्य यामुळे हा पाठ सोहळा यशस्वीपणे पार पडला.
नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने दुर्गा सप्तशती पठनाद्वारे देवीची एकत्रित आराधना करण्याचा अनोखा उपक्रम भाविकांसाठी अध्यात्मिक उर्जा देणारा ठरला.



