
न्यायभूमी
लासलगाव दि.१४ मार्च सहसंपादक सुनील पोळ
मोटार अपघात नुकसान भरपाई प्राधिकरणासमोर (MACP) चाललेल्या दाव्यात, अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या एका लष्करी जवानाच्या वारसांना तब्बल १ कोटी २० लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळवून देण्यात यश आले आहे.
चोलामंडलम एम.एस. जनरल इन्शुरन्स कंपनीसोबत लोक अदालतीमध्ये/पॅनलसमोर झालेल्या तडजोडीअंती हा महत्त्वपूर्ण निर्णय देण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत योगेश सुकदेव शिंदे (वय ३०) हे राजस्थानमधील जोधपूर येथे ‘३३, मिडीयम रेजिमेंट’मध्ये सैन्य दलात कार्यरत होते.
दिनांक १५ सप्टेंबर २०२३ रोजी एका अपघातात त्यांचे अकाली निधन झाले. कुटुंबाचा मुख्य आधार हरपल्याने त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, मुलगा कु. शिवराज,आई मिराबाई सुकदेव शिंदे आणि वडील सुकदेव काशिनाथ शिंदे यांनी निफाड येथील मे. मोटार अपघात नुकसान भरपाई प्राधिकरणाकडे नुकसान भरपाईसाठी दावा (अर्ज क्र. १७/२०२३) दाखल केला होता.
हा दावा चोलामंडलम जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या विरुद्ध दाखल करण्यात आला होता.
या दाव्यावर नुकतीच सुनावणी होऊन दोन्ही पक्षांमध्ये सामंजस्याने तडजोड झाली.
या तडजोडीअंती विमा कंपनीने मयताच्या वारसांना १ कोटी २० लाख रुपये देण्याचे मान्य केले.
ही तडजोड यशस्वीरीत्या घडवून आणण्यासाठी चोलामंडलम इन्शुरन्स कंपनीचे सी.टी.ओ.श्री. प्रविण पाठक, राष्ट्रीय व्यवस्थापक श्री.सुब्बीह एम.प्रादेशिक व्यवस्थापक श्री.विशाल गुप्ता, झोनल मॅनेजर श्री.प्रेमानंद पी.कायदेशीर व्यवस्थापक श्री.संतोष मोरे,श्री.राजेशकुमार आणि श्री.नयन थोरात यांचे विशेष सहकार्य लाभले.
याकामी अर्जदारांतर्फे ॲड.गोविंद लक्ष्मण दुधे आणि ॲड.रवींद्र कचरू घोटेकर यांनी,तर इन्शुरन्स कंपनीतर्फे ॲड.शरद अष्टपुत्रे आणि ॲड.नंदू फसाले यांनी कामकाज पाहिले.
निफाड येथील पॅनल हेड मा.के.आर.जोगळेकर साहेब आणि पॅनल सदस्य ॲड.पी.एस.केदार यांच्या पॅनलसमोर ही तडजोड प्रक्रिया पार पडली.
मिळालेल्या या भरघोस नुकसान भरपाईच्या रकमेवर मयताच्या वारसांनी समाधान व्यक्त केले असून,न्यायालयाच्या या निर्णयामुळे दुःखात असलेल्या कुटुंबाला मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.



