विंचूर मंडळ अधिकाऱ्यांकडून कामांची टाळाटाळ ; शेतकरी कृती समितीची विभागीय आयुक्तांकडे तक्रार
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
न्यायभूमी
विंचूर दि.:०७ डिसेंबर मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
निफाड तालुक्यात रस्ते खुले करण्याच्या कामात विंचूर मंडळ अधिकाऱ्यांकडून सतत टाळाटाळ होत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र राज्य शिव पानद शेत रस्ते चळवळ कृती समितीने केला असून,संबंधित मंडळ अधिकारी संतोष डुंबरे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांची बदली करण्याची मागणी समितीने विभागीय आयुक्त, नाशिक जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
कृती समितीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की,शासन निर्णय आणि जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या आदेशानुसार जानेवारी–फेब्रुवारी २०२५ मध्ये रस्ते खुले करण्याची मोहीम राबवली.
या मोहिमेत तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या नेतृत्वाखाली अनेक ठिकाणी रस्ते समन्वयाने खुले करण्यात यश आले.परंतु विंचूर मंडळात मात्र गेल्या ११ महिन्यांपासून एकाही रस्त्याचे काम पूर्ण केले नसल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र राज्य शिव पानद शेत रस्ते चळवळ कृती समितीने केला आहे.
तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून बैठका घेणे, अडचणी सोडवणे आणि संबंधित विभागांना आदेश देणे अशी सक्रिय भूमिका घेतली.याकाळात ११ गावनकाशावरील रस्ते १४ खाजगी गटातील शेत रस्ते अशा एकूण २५ रस्त्यांची कामे पूर्ण झाली.कृती समितीने तहसीलदार व त्यांच्या टीमचे कौतुकही केले.कृती समितीच्या तक्रारीत विंचूर मंडळातील परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचे नमूद केले आहे.समितीचे म्हणणे असे आहे की,“गेल्या ११ महिन्यांपासून विंचूर मंडळ अधिकारी संतोष डुंबरे यांनी एकाही रस्त्याचे काम पूर्ण केले नाही.
उलट मोजणी व रस्ते मोकळे करण्याच्या प्रक्रियेत सतत टाळाटाळ केली जात आहे.” आजवर एकाही अर्जाला उत्तर नाही, निकाली न काढलेल्या अर्जाबाबत विचारणा केली असता मंडळ अधिकारी म्हणतात.
“माझ्याकडे 15 गावे आहेत. मला काही तुमचे एकच काम नाही.”
विंचूर मंडळातील शेतकरी, नागरिक, महिला, वयोवृद्ध — सर्वजण सतत या समस्यांनी त्रस्त आहेत.
रस्ते बंद,अतिक्रमण,चुकीची मोजणी,लांबवलेली प्रक्रिया यामुळे वाहतूक,शेती कामे आणि आपत्कालीन परिस्थितींमध्ये गंभीर अडचणी निर्माण होत आहे.त्यामुळे नागरिक व शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
या सर्व प्रकारांची दखल घेऊन विंचूर मंडळ अधिकारी संतोष डुंबरे यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्यांची तत्काळ बदली करावी, अशी मागणी कृती समितीने केली आहे.



