JCBच्या साह्याने सरकारी नाल्यावर अतिक्रमण;५० वर्षांचे चिंचेचे झाड जमीनदोस्त
रस्ता असतानाही रस्ता बंद,प्रशासन मात्र झोपेत!
न्यायभूमी
विंचूर दि.११ फेब्रुवारी

विचूर येथील गट क्रमांक १४६ मधून जाणाऱ्या सरकारी नाला व सार्वजनिक रस्त्यावर शिवाजी कारभारी घायाळ यांनी JCB च्या साह्याने थेट हस्तक्षेप करत नाला उचलून अतिक्रमण केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
या कारवाईदरम्यान कोणतीही शासकीय परवानगी नसताना सुमारे ५० वर्षांचे चिंचेचे झाड तोडून जमीनदोस्त करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
सदर ठिकाणी अधिकृत सार्वजनिक रस्ता अस्तित्वात असतानाही तो पूर्णतः बंद करण्यात आल्याने ग्रामस्थांची ये-जा ठप्प झाली आहे. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पर्यायी व लांबचा मार्ग वापरावा लागत असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
सरकारी नाल्याची रुंदी कमी करून त्यात माती टाकण्यात आल्याने पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडविला गेला आहे. परिणामी आगामी पावसाळ्यात शेतजमिनींमध्ये पाणी साचण्याचा तसेच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
या प्रकरणी ग्रामस्थांनी मंडळ अधिकारी यांच्याकडे लेखी अर्ज सादर केला असूनही अद्याप साधी स्थळ पाहणीसुद्धा न झाल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.त्यामुळे “रस्ता असूनही रस्ता बंद आणि प्रशासन मात्र झोपेत” अशी तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
या संपूर्ण प्रकाराची तातडीने चौकशी करून सरकारी नाल्यावर व सार्वजनिक रस्त्यावर केलेले अतिक्रमण त्वरित हटवावे,बेकायदेशीर झाडतोड प्रकरणी स्वतंत्र कारवाई करावी.
तसेच दोषींवर कठोर पावले उचलावीत,अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिक व शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.
दोन दिवसात तलाठी व मंडळ अधिकारी जागेवरती येऊन पाहणी करून विषय मार्गी लावल्या जाईल
प्रतिक्रिया :-तहसीलदार विशाल नाईकवाडे निफाड



