विष्णूनगर गावातील स्मशानभूमीची दुरावस्था!
तुटलेले पत्रे, मोडकळीस आलेला अंत्यविधी ओटा; नवीन स्मशानभूमीला तात्काळ मंजुरीची मागणी!

न्यायभूमी
विष्णूनगर : दिनांक १९ सप्टेंबर

मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातील विष्णूनगर गावातील स्मशानभूमीची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून, मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्मशानभूमीची सद्यस्थिती पाहता केवळ डागडुजी न करता नवीन व सर्व सुविधायुक्त स्मशानभूमी उभारण्यासाठी तात्काळ मंजुरी द्यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
स्मशानभूमीवरील पत्र्याच्या शेडला मोठमोठे होल पडले असून अनेक पत्रे तुटलेली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो. विशेषतः अंत्यविधीच्या वेळी पावसापासून संरक्षण मिळणेही कठीण होण्याची शक्यता आहे.

याशिवाय अंत्यविधीसाठी असलेला ओटा पूर्णपणे तुटलेल्या व मोडकळीस आलेल्या अवस्थेत आहे. आयुष्याच्या शेवटच्या प्रवासाला निरोप देण्यासाठी येणाऱ्या कुटुंबीयांसाठी स्मशानभूमीची ही अवस्था अत्यंत चिंताजनक आहे.
स्मशानभूमीत महिलांसाठी योग्य बैठक व्यवस्था नाही, तर ज्येष्ठ नागरिकांसाठीही पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. तसेच परिसरात पेव्हर ब्लॉकचा अभाव असल्याने पावसाळ्यात चिखल आणि साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे ग्रामस्थांनी आता जुनी स्मशानभूमी केवळ दुरुस्त करण्याऐवजी नवीन, सुसज्ज आणि सर्व सुविधायुक्त स्मशानभूमी उभारावी, अशी मागणी केली आहे. नवीन स्मशानभूमीत मजबूत अंत्यविधी ओटा, पावसापासून संरक्षण करणारे सुसज्ज शेड, महिलांसाठी बैठक व्यवस्था, ज्येष्ठ नागरिकांसाठी आसनव्यवस्था तसेच संपूर्ण परिसरात पेव्हर ब्लॉकची सुविधा करण्यात यावी.
हा अत्यंत संवेदनशील प्रश्न असल्याने संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने दखल घेऊन नवीन स्मशानभूमीसाठी प्रशासकीय मंजुरी व आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
तुटलेले पत्रे आणि मोडकळीस आलेला अंत्यविधी ओटा आणखी किती दिवस असेच राहणार?
महिलांसाठी बैठक व्यवस्था आणि पेव्हर ब्लॉकची सुविधा कधी उपलब्ध होणार?
विष्णूनगरच्या नवीन स्मशानभूमीला तात्काळ मंजुरी कधी मिळणार?
शेवटच्या प्रवासाची जागा तरी सुरक्षित, स्वच्छ आणि सन्मानजनक असावी—हीच विष्णूनगर ग्रामस्थांची रास्त अपेक्षा आहे.


