Breaking
कृषीवार्ता

विंचूर परिसरातील रात्रीचे लोडशेडिंग बंद करण्याची मागणी महावितरणला निवेदन

हनुमान नगरसह ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर; सहाय्यक अभियंता श्री. पाटील यांचे लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन

1 3 1 7 3 4

न्यायभूमी 

विंचूर प्रतिनिधी | दि.१९ सप्टेंबर २०२६

विंचूर : हनुमान नगरसह आजूबाजूच्या ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी होणाऱ्या दीर्घकाळाच्या वीजखंडितामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर महावितरणच्या विंचूर कार्यालयाचे सहाय्यक अभियंता श्री. पाटील यांना निवेदन देण्यात आले.

रात्रीचे लोडशेडिंग शक्यतो पूर्णपणे बंद ठेवावे, अपरिहार्य परिस्थितीत लोडशेडिंग करावे लागल्यास किमान एक तास अगोदर नागरिकांना पूर्वसूचना द्यावी आणि जाहीर केलेल्या वेळेचे काटेकोरपणे पालन करावे, अशा प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.

ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी ६ ते ७ तासांपर्यंत वीजपुरवठा खंडित राहिल्यास नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होण्याबरोबरच सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

हनुमान नगरसह परिसरात रात्रीच्या वेळी बिबट्यांचा वावर, चोरीची भीती तसेच ड्रोन घिरट्या घालताना दिसल्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये सुरक्षेबाबत चिंता असल्याचेही निवेदनात निदर्शनास आणून देण्यात आले.

रात्रीचे लोडशेडिंग बंद ठेवण्याची मागणी

ग्रामीण भागातील परिस्थिती लक्षात घेता रात्रीच्या वेळेतील लोडशेडिंग शक्यतो पूर्णपणे बंद ठेवण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. शहर आणि ग्रामीण भाग असा भेदभाव न करता सर्व भागांना समान व न्याय्य पद्धतीने वीजपुरवठ्याचे नियोजन करण्यात यावे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

एक तास आधी पूर्वसूचना देण्याची मागणी

तांत्रिक कारणांमुळे अथवा अन्य अपरिहार्य परिस्थितीमुळे रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित करणे आवश्यक असल्यास संबंधित गावातील नागरिकांना किमान एक तास अगोदर पूर्वसूचना देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच वीजपुरवठा कोणत्या वेळी बंद करण्यात येणार आणि कोणत्या वेळी पूर्ववत करण्यात येणार, याची स्पष्ट माहिती नागरिकांना देण्यात यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले.

जाहीर वेळेचे काटेकोर पालन करण्याची मागणी

लोडशेडिंगची वेळ जाहीर केल्यानंतर त्याचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. पूर्वसूचित वेळेपूर्वी वीजपुरवठा बंद करू नये तसेच निश्चित केलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ वीजपुरवठा बंद ठेवू नये, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली.

रात्रीच्या वेळी वीजपुरवठा दीर्घकाळ खंडित राहिल्यास गावातील रस्ते, वस्ती आणि घरांच्या आसपासचा परिसर अंधारात राहतो. त्यामुळे बिबट्या, चोरी तसेच इतर सुरक्षाविषयक घटनांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण नागरिकांची चिंता वाढत असल्याचे निवेदनातून स्पष्ट करण्यात आले.

नागरिकांच्या नाराजीची दखल घेण्याची मागणी

वारंवार होणाऱ्या वीजखंडितामुळे ग्रामीण नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून भविष्यात या प्रश्नावर नागरिकांचा उद्रेक होण्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी महावितरणने वेळीच योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

निवेदन स्वीकारल्यानंतर महावितरणचे विंचूर येथील सहाय्यक अभियंता श्री. पाटील यांनी या प्रश्नाची दखल घेत लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

त्यामुळे ग्रामीण नागरिकांच्या मागण्यांवर महावितरण प्रशासनाकडून कोणती कार्यवाही केली जाते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

4/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 3 1 7 3 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे