निफाड तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींच्या सदस्य आरक्षणावर २३ हरकती
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
लासलगाव दि.२९ जून कैलास उपाध्ये जिल्हा प्रतिनिधी
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२६ कार्यक्रमानुसार निफाड तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींमधील सदस्य पदांच्या प्रभागनिहाय आरक्षण प्रक्रियेला वेग आला असून, प्रारूप आरक्षणावर ९ ग्रामपंचायतींकडून एकूण २३ हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत.
प्राप्त हरकतींवर नियमानुसार कार्यवाही सुरू असल्याची माहिती तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी दिली.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १९ ते २५ जून २०२६ या कालावधीत प्रारूप प्रभागनिहाय आरक्षणाबाबत हरकती व सूचना स्वीकारण्यात आल्या.
या कालावधीत विंचूर/विठ्ठलवाडी येथून सर्वाधिक १०, सायखेडा येथून ३, वाहेगाव/दहेगाव, भेंडाळी आणि नांदूर मध्यमेश्वर येथून प्रत्येकी २,तर नांदूरखुर्द, गोरठाण,शिरवाडे वणी आणि गाजरवाडी येथून प्रत्येकी १ हरकत प्राप्त झाली.
प्राप्त सर्व हरकती व सूचनांची उपविभागीय अधिकारी स्तरावर सविस्तर छाननी करून त्यावर नियमानुसार अभिप्राय नोंदविण्यात येणार आहे.
त्यानंतर अंतिम प्रभागनिहाय सदस्य आरक्षणाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार ३ जुलै २०२६ रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांचा अभिप्राय प्राप्त होणार असून,दिनांक ८ जुलै रोजी अंतिम आरक्षण प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे.
त्यानंतर दिनांक १० जुलै २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर अंतिम प्रभागनिहाय सदस्य आरक्षण (नमुना-अ) व्यापक प्रसिद्धीस देण्यात येईल.
ग्रामपंचायत सदस्य आरक्षणाची संपूर्ण प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार पारदर्शक,निष्पक्ष आणि कायदेशीर तरतुदींनुसार राबविण्यात येत असल्याचे स्पष्ट करत नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे,असे आवाहन तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी केले आहे.