खेडलेझुंगे येथे गुटखा व गावठी दारूचा साठा जप्त
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
लासलगाव दि.०४ नोव्हेंबर
लासलगाव पोलीस ठाण्याचे सपोनि भास्करराव शिंदे यांच्या पथकाने खेडलेझुंगे परिसरात सलग दोन कारवायांमध्ये राज्य शासनाने बंदी घातलेल्या गुटख्याचा साठा तसेच बेकायदा गावठी हातभट्टी दारूचा साठा जप्त केला आहे.
या दोन्ही प्रकरणांत दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या कारवाईत,दि.3 नोव्हेंबर 2025 दुपारी एक वाजेच्या सुमारास लासलगाव पोलिसांनी खेडलेझुंगे येथील योगीराज हॉटेलवर छापा टाकला.
या वेळी आरोपी अरुण गिते (वय 40, रा. खेडलेझुंगे) याच्याकडे विविध कंपन्यांचा सुगंधित पानमसाला,गुटखा आणि जर्दा असा राज्य शासनाने बंदी घातलेला माल साठवून ठेवलेला आढळला.
पोलिसांनी घटनास्थळावरून डायरेक्टर,गोवा, विमल,शॉट,राजनिवास,जी-1 आणि आर.एन.-01 अशा ब्रँडचा गुटखा व पानमसाला जप्त केला.
या मालाची किंमत सुमारे ₹8,030 असून, महाराष्ट्र शासनाच्या 18 जुलै 2023 च्या अधिसूचनेनुसार या उत्पादनांवर विक्री व साठवणीस बंदी आहे.
आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मानवी आरोग्यास अपायकारक पदार्थ विक्रीसाठी ठेवले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 123, 223, 274 व 275 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या कारवाईत,याच पथकाने छापा टाकून बेकायदा गावठी हातभट्टी दारूचा साठा जप्त केला.
या वेळी ज्ञानेश्वर पुंडलीक लोखंडे (वय 39, रा. खेडलेझुंगे) हा आपल्या राहत्या घराच्या आडोश्यात गावठी दारू साठवून ठेवत असल्याचे आढळले.
पोलिसांनी 20 लिटरच्या कॅनमध्ये भरलेली 18 लिटर दारू असा एकूण ₹1,800 किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
या प्रकरणी पोलीस शिपाई दगडू श्रवण शिंदे यांनी फिर्याद दिली असून,आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम,1949 चे कलम 65(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाई साठीच्या पथकामध्ये या पोलीस हवालदार संदीप शिंदे,पोशि दगु शिंदे,सफर आरोटे,अरुण डोंगरे आदींचा समावेश होता.
पुढील तपास सपोनि भास्कर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि किसन पवार,पोलीस हवालदार संदीप शिंदे करीत आहेत.
लासलगाव पोलिसांच्या या प्रभावी व सलग कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
स्थानिक नागरिकांकडून पोलिसांच्या तत्पर आणि प्रशंसनीय कार्याचे कौतुक होत असून, त्यांच्या दक्षतेचे अभिनंदन करण्यात येत आहे.