लासलगाव परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करा, अन्यथा महावितरणला टाळे ठोकू! ४६ गावांतील शिवसैनिक, शेतकरी आणि गणेशभक्तांचा मोठा सहभाग
लासलगाव महावितरण कार्यालयाला घेराव

न्यायभूमी
लासलगाव दिनांक १७ सप्टेंबर प्रतिनिधी कैलास उपाध्ये

ग्रामीण भागातील सायंकाळच्या वीज भारनियमनाच्या प्रश्नावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने गुरुवार, दि.१७ सप्टेंबर रोजी लासलगाव येथील महावितरण कार्यालयातील उपकार्यकारी अभियंत्यांना घेराव घालण्यात आला.
वीजपुरवठा तातडीने सुरळीत न केल्यास महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल तसेच एकाही अधिकाऱ्याला ग्रामीण भागात फिरू दिले जाणार नाही, असा इशारा आंदोलकांच्या वतीने देण्यात आला.
गणेशोत्सवाच्या काळातच ग्रामीण भागात दररोज सायंकाळच्या वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक आणि गणेशभक्तांमध्ये नाराजी आहे.
गणरायाची पूजा-अर्चा अंधारात करण्याची वेळ नागरिकांवर येत असून, परिसरात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याने सायंकाळच्या वेळी वीज बंद राहणे हे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही गंभीर आहे.
या प्रश्नावर अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी निफाड तालुक्यातील ४६ गावांमधून शेकडो शिवसैनिक, शेतकरी बांधव आणि गणेशभक्त लासलगाव महावितरण कार्यालयात दाखल झाले.
यावेळी ग्रामीण भागातील वीजपुरवठा, सायंकाळचे भारनियमन आणि गणेशोत्सवाच्या काळातील नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत अधिकाऱ्यांसमोर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. वीजपुरवठ्याची समस्या लवकरात लवकर सोडविण्यात यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

आंदोलनात माजी पंचायत समिती सभापती शिवा पाटील सुरासे, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जगताप, उत्तमराव वाघ, डॉ. श्रीकांत आवारे, गणेश डोमाडे, बद्रीनाथ लोहारकर, ज्ञानेश्वर तासकर, आत्माराम दरेकर, संतोष पानगव्हाणे, शंकरराव शिंदे, सतीश गांगुर्डे, दिलीप गांगुर्डे, बाबुराव गांगुर्डे, बापूसाहेब डुबंरे, रामनाथ सुराशे, रवींद्र पाचोरकर, वसंत खुर्दे, सचिन पवार, रेवन्नाथ शिंदे, शरद शिंदे, रामदास काळे, सोमनाथ केंदळे, तुळशीराम सुराशे, बाजीराव जाधव, संजय जाधव, बापूसाहेब भोसले, प्रवीण नाईक, जितेंद्र जाधव, नाना खुर्दे, शिवाजी खुर्दे, पढरीनाथ साप्ते यांच्यासह शिवसैनिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



