Breaking
महाराष्ट्र

वीरपत्नी ताराजी ओंबळे यांच्या हस्ते मेढा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन

४५ प्रकरणांचा समोपचाराने निपटारा; ५ लाख २९ हजार २९४ रुपयांची वसुली

1 2 0 4 3 4

न्यायभूमी 

मेढा दि.१४ सप्टेंबर २०२६ 

मा. सर्वोच्च न्यायालय, मा. उच्च न्यायालय, मुंबई व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशानुसार मेढा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले.

न्यायाधीश डॉ. विक्रम अंबादास आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या लोक अदालतीचे उद्घाटन २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यात देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारे शहीद तुकारामजी ओंबळे यांच्या वीरपत्नी श्रीमती ताराजी तुकाराम ओंबळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्या कन्या वैशाली ओंबळे यांचीही उपस्थिती होती.

शहीद तुकारामजी ओंबळे यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यावेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडण्यासाठी अतुलनीय शौर्य, धैर्य आणि प्रसंगावधान दाखविले. राष्ट्रासाठी केलेल्या त्यांच्या सर्वोच्च बलिदानाबद्दल भारत सरकारने त्यांना मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करून सन्मानित केले. तसेच न्यूयॉर्क सिटी पोलीस विभागाकडूनही त्यांना “Honor and Remember” या सन्मानाने गौरविण्यात आले आहे. अशा वीर शहीदाच्या वीरपत्नीच्या हस्ते लोक अदालतीचे उद्घाटन होणे हा मेढा न्यायालयासाठी अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी क्षण ठरला.

सदर राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयातील दिवाणी व फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. यामध्ये एकूण ४५ प्रकरणांचा समोपचाराने निपटारा करण्यात आला असून, एकूण ५,२९,२९४ रुपयांची वसुली झाली. दिवाणी, फौजदारी, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट कलम १३८, कौटुंबिक प्रकरणे, बँकिंग वसुलीची प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणांचा यामध्ये समावेश होता.

यावेळी जावली तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. आर. एस. पोफळे यांनी लोक अदालतीच्या माध्यमातून तडजोड करून पक्षकारांनी आपल्या अमूल्य वेळेची बचत करावी, तसेच अहंकार बाजूला ठेवून परस्पर सामंजस्याने वाद मिटविल्यास चांगल्या प्रकारे तडजोड होऊ शकते, असे सांगितले.

जावली तालुका वकील संघाच्या ॲड. पी. डी. गोरे यांनी, तंटे आपणच निर्माण करतो आणि ते मिटविण्याची क्षमताही आपल्यामध्येच असते. त्यामुळे लोक अदालतीचा लाभ घेऊन प्रकरणे समोपचाराने मिटवून घ्यावीत, असे आवाहन केले.

डॉ. विक्रम अंबादास आव्हाड यांनी लोक अदालत हे आपापसातील वाद सामंजस्याने संपुष्टात आणण्यासाठी प्रभावी माध्यम असून, “लोकांनी लोकांसाठी आणि लोकांच्या हितासाठी” आयोजित केलेले हे व्यासपीठ आहे, असे मत व्यक्त केले. लोक अदालतीमध्ये तडजोड करून पक्षकारांनी आपल्या अमूल्य वेळेची व खर्चाची बचत करावी, असेही त्यांनी सांगितले.

शहीद तुकारामजी ओंबळे यांच्या शौर्याचा उल्लेख करताना डॉ. विक्रम मिनाक्षी अंबादास आव्हाड यांनी, “शहीद तुकारामजी ओंबळे यांनी देशसेवेसाठी आपले आयुष्य पणाला लावून राष्ट्रासाठी सर्वोच्च बलिदान दिले. त्यांचे शौर्य आणि राष्ट्रसेवा आजच्या पिढीसाठी सदैव प्रेरणादायी आहे,” असे गौरवोद्गार काढले.

सदर लोक अदालतीच्या पॅनेलवर डॉ. विक्रम आव्हाड व ॲड. पी. डी. गोरे यांनी कामकाज पाहिले. कार्यक्रमास जावली तालुका वकील संघाचे अध्यक्ष व सदस्य, सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्री. श्रीनिवास कणसे, मेढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. सुधीर पाटील, ॲड. विशाल महाडिक, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया यांचे अधिकारी व व्यवस्थापक तसेच विद्युत पारेषण विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. आर. लिंगडे यांनी केले. राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी करण्यासाठी जावली तालुका वकील संघाचे अध्यक्ष व सदस्य, सहाय्यक सरकारी अभियोक्ता, मेढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. सुधीर पाटील तसेच न्यायालयीन कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

शौर्याला सलाम…!

शहीद तुकारामजी ओंबळे यांचे राष्ट्रासाठीचे सर्वोच्च बलिदान आणि अतुलनीय शौर्य सदैव प्रेरणादायी राहील. त्यांच्या वीरपत्नी श्रीमती ताराजी ओंबळे यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन होणे हा मेढा न्यायालयाच्या इतिहासातील निश्चितच एक भावपूर्ण आणि अभिमानास्पद क्षण ठरला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 2 0 4 3 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे