Breaking
महाराष्ट्र

पीक विम्याच्या प्रश्नावर देवगाव येथे’सरण आंदोलन’सुरू; प्रशासनासमोर शेतकऱ्यांचा एल्गार

ठोस निर्णयाशिवाय माघार नाही आंदोलकांचा निर्धार

1 1 0 1 6 5

न्यायभूमी 

 नासिक दि.२० जुलै कैलास उपाध्ये

देवगाव महसूल मंडळातील खरीप २०२५ हंगामातील प्रलंबित पीक विमा दाव्यांच्या प्रश्नावर प्रशासनासोबतची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीने सोमवार,दि.२० जुलै रोजी देवगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ‘सरण आंदोलन’ सुरू करण्यात आले.

पीक विम्याची रक्कम प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका आंदोलकांनी घेतल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

     यापूर्वी निफाड तहसील कार्यालयात तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या उपस्थितीत शेतकरी प्रतिनिधी व प्रशासनाची बैठक झाली होती.

बैठकीत प्रलंबित पीक विमा दावे मंजूर करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन देण्यात आले.

मात्र, केवळ आश्वासनांवर समाधान मानण्यास शेतकऱ्यांनी स्पष्ट नकार देत जाहीर कार्यक्रमानुसार आज ‘सरण आंदोलन’ सुरू केले.खरीप २०२५ हंगामात अतिवृष्टीमुळे सोयाबीन,मका,टोमॅटो तसेच इतर पिकांचे ७० ते ९० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले होते.

मात्र, विमा कंपनीने सदोष पीक कापणी प्रयोग, चुकीचे पंचनामे,हवामान केंद्राच्या त्रुटीपूर्ण नोंदी आणि अन्यायकारक निकषांच्या आधारे मोठ्या प्रमाणावर दावे फेटाळल्याने हजारो शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे.

या अन्यायाविरोधातच ग्रामपंचायत कार्यालयासमोर प्रतीकात्मक सरण उभारून आंदोलन करण्यात आले. आंदोलनस्थळी “विमा आमच्या हक्काचा,नाही कुणाच्या बापाचा” “पीक विमा मिळालाच पाहिजे” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

आंदोलकांनी विमा कंपनीच्या कार्यपद्धतीविरोधात तीव्र संताप व्यक्त करत सदोष पीक कापणी प्रयोगांची चौकशी,देवगाव हवामान केंद्राच्या चुकीच्या नोंदींची तपासणी, अन्यायकारक ‘ट्रिगर’ निकष रद्द करून प्रलंबित सर्व दावे मंजूर करण्याची मागणी केली.

आंदोलनादरम्यान मनोहर बोचरे, धनंजय जोशी, जयवंत लोहारकर, राजेंद्र मेमाणे आदी शेतकरी प्रतीकात्मक सरणावर बसले होते.आंदोलनात निर्भय महाराष्ट्र पार्टीचे जितेंद्र भावे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे पाटील,सचिन होळकर,अशोक नागरे,शिवाजी सुपनर,डॉ.श्रीकांत आवारे,विनोद जोशी, भाऊसाहेब बोचरे,माणुसकी फाउंडेशनचे सागर निकाळे,भाऊसाहेब भवर,शिवा सुरासे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जगताप,प्रकाश घोटेकर, राजेंद्र पाटील यांच्यासह देवगाव महसूल मंडळातील मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी कांतिलाल पाटील,तहसीलदार विशाल नाईकवाडे,तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार, लासलगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते तसेच महसूल, कृषी आणि पोलिस विभागाचे अधिकारी आंदोलनस्थळी तैनात होते.

आंदोलन शांततेत सुरू असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.आंदोलन सुरू असताना तहसीलदार विशाल नाईकवाडे व उपविभागीय पोलिस अधिकारी कांतिलाल पाटील यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

मात्र, ठोस निर्णयाशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी कायम ठेवली. अखेर तहसीलदार नाईकवाडे यांनी आंदोलकांचे जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून बोलणे करून दिले.त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आज सायंकाळी ६ वाजता बैठकीचे आयोजन केले.

या बैठकीस जिल्हा कृषी अधिकारी माने, उपविभागीय पोलिस अधिकारी कांतिलाल पाटील, तहसीलदार विशाल नाईकवाडे, भाऊसाहेब बोचरे, विनोद जोशी,बाबासाहेब गुजर,मनोहर बोचरे तसेच शेतकरी प्रतिनिधी उपस्थित राहणार असून या बैठकीत तोडगा निघतो का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

• प्रमुख मागण्या

खरीप २०२५ मधील सर्व प्रलंबित पीक विमा दावे तातडीने मंजूर करावेत,विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम त्वरित जमा करावी,सदोष पीक कापणी प्रयोगांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.

देवगाव हवामान केंद्राच्या चुकीच्या नोंदींची चौकशी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अन्यायकारक ‘ट्रिगर’ निकषांमध्ये बदल करावा, विमा कंपन्यांना पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून तालुकास्तरावर पीक विमा केंद्र सुरू करावे, शासकीय पंचनामे आणि विमा कंपन्यांच्या निकषांतील विसंगती दूर करावी.

चुकीचे अहवाल सादर करणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत.

नाकारलेले सर्व पीक विमा दावे मंजूर करून नुकसानभरपाई तात्काळ वितरित करावी.

2/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 0 1 6 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे