नाशिक जिल्ह्यातील प्रकार जादूटोण्याची भीती दाखवून बलात्कार
विवाहित भोंदूबाबाने जबरदस्तीने केले लग्न

न्यायभूमी
नाशिक जिल्हा प्रतिनिधी दि.०६ जुलै कैलास उपाध्ये
धंद्यात भरभराट करून देण्याचे आमिष दाखवत जादूटोण्याची भीती घालून एका महिलेवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिच्याशी जबरदस्तीने विवाह केल्याप्रकरणी सायखेडा पोलिसांनी भोंदूबाबा यौवन भानुदास गोहाड (रा. दारणा सांगवी) याला अटक केली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) पाठपुराव्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचवटी परिसरातील पीडित महिला चहाचे दुकान चालवत होती.
व्यवसायात अपेक्षित उत्पन्न होत नसल्याने ओळखीच्या व्यक्तींनी तिला दारणा सांगवी येथील भोंदूबाबा यौवन गोहाड याच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. गोहाड याने मंत्रतंत्र, जादूटोणा आणि मंतरलेले तांदूळ,धुनी तसेच जडीबुटीच्या पूडीच्या माध्यमातून व्यवसायात भरभराट होईल,असे सांगून तिच्याकडून तीन हजार रुपये उकळले.
त्यानंतर “माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले नाहीत तर जादूटोणा करून तुला ठार मारीन,” अशी धमकी देत आरोपीने पीडितेवर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपीचे पहिले लग्न झालेले असतानाही त्याने पीडितेशी जबरदस्तीने विवाह केला.
लग्नानंतर घरात सुरू असलेल्या भोंदूगिरीला पीडित महिलेने विरोध केल्याने आरोपीने तिला मारहाण,शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमक्या देण्यास सुरुवात केली.
हा छळ दोन ते तीन वर्षे सुरू होता. काही दिवसांपूर्वी आरोपीने पीडित महिला व त्यांच्या एक वर्षाच्या मुलाचा गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.त्यातून सुटका करून घेत पीडित महिला नातेवाईकांकडे गेली.
यानंतर पीडित महिला व तिच्या नातेवाईकांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी तिला नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात नेऊन तक्रार दाखल करण्यासाठी मदत केली.
जिल्हा पोलीस अधीक्षक डी.एस.स्वामी यांच्या निर्देशानुसार सायखेडा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष,अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी यौवन गोहाड याने यापूर्वीही अनेक व्यक्ती व कुटुंबांची मंत्रतंत्र व जादूटोण्याच्या नावाखाली फसवणूक व शोषण केले असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
अशा प्रकारची फसवणूक किंवा अत्याचार सहन केलेल्या नागरिकांनी निर्भयपणे पुढे येऊन पोलिसांकडे तक्रार नोंदवावी,असे आवाहन अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ.टी.आर.गोराणे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.आशा लांडगे,प्रल्हाद मिस्त्री व कृष्णा चांदगुडे यांनी केले आहे.


