घंटागाडीच नाही,कचराकुंडीही नाही! बाभुळगाव बु.मध्ये ग्रामपंचायतच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
न्यायभूमी न्युज संपादकीय विभाग

न्यायभूमी
नाशिक दि.३० डिसेंबर सुनील क्षिरसागर
येवला तालुक्यातील बाभुळगाव बु.येथे ग्रामपंचायतच्या निष्क्रियतेमुळे कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर बनला असून,नागरिकांचे आरोग्य थेट धोक्यात आले आहे.
गावात ना घंटागाडी,ना कचराकुंडी—अशी दयनीय अवस्था निर्माण झाली असून,विशेषतः पाटोदा रोडवरील म्हसोबा कॉलनी परिसरात कचरा उचलण्याची कोणतीही नियमित व्यवस्था नाही.
कचरा उचलण्याची सुविधा नसल्याने घरासमोर व रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचले आहेत.परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून,नागरिकांना ये-जा करणेही अवघड झाले आहे.
स्वच्छते अभावी डास,माश्यांचा प्रादुर्भाव वाढत असून,लहान मुले,महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.संसर्गजन्य आजारांचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.
या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी दिनांक १९/११/२०२५ रोजी सरपंच व ग्रामसेवक यांना लेखी निवेदन दिले.
मात्र,त्या निवेदनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.वारंवार फोन करून माहिती दिल्यानंतरही ग्रामपंचायतकडून उडवा-उडवीची उत्तरे दिली जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप खदखदत आहे.
“कर नियमित भरतो,पण मूलभूत सुविधा मिळत नाहीत,”अशी रोषपूर्ण प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.

तातडीने घंटागाडी सुरू करावी किंवा किमान कचराकुंडीची ठोस व्यवस्था उपलब्ध करून द्यावी,अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
अन्यथा, परिसरातील साचलेला सर्व कचरा थेट ग्रामपंचायत कार्यालयात आणून टाकण्याचा इशारा नागरिकांनी दिला असून,याची गंभीर दखल प्रशासनाने घ्यावी,अशी मागणी होत आहे.
बाभुळगाव बु.येथील नागरिकांना स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण मिळावे यासाठी तात्काळ उपाययोजना करणे अत्यावश्यक असून,ग्रामपंचायत प्रशासनाने वेळकाढूपणा थांबवून या समस्येकडे गांभीर्याने पाहावे,अशी जोरदार अपेक्षा व्यक्त होत आहे.



