शेतीला तार कंपाऊंड साठी योजना आणण्याची गरज:-काँग्रेस नेते,कृषीतज्ञ सचिन होळकर
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
विंचूर दि ०७ जुलै अभय पाटील
महाराष्ट्रातील सर्वच गावांमध्ये आणि शहरांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीला नुकसानकारक ठरतील असे मोकाट जनावरे,प्राणी यांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव होत असतो.
मोकाट गाई, हरीण,मोर,रानडुक्कर,नीलगाय यासारख्या विविध प्राण्यांच्या उपद्रवामुळे अनेक भागात शेती व्यवस्था धोक्यात आली आहे.
शहरानजीक असणाऱ्या शेतीला तसेच जंगल भाग जवळ असणाऱ्या शेतीक्षेत्राला या प्राण्यांचा मोठा त्रास आहे.दिवसेंदिवस अन्न पाण्याच्या शोधात शेतकऱ्यांच्या शेताकडे या जनावरांचा ओघ असतो.
साधी पिके घेणाऱ्या तसेच कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना तारेचे कंपाउंड करणे आर्थिक दृष्ट्या परवडण्याजोगे नाही.
या प्रकारचे तारेचे कंपाउंड करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो.या जनावरांपासून रक्षण करण्यासाठी अनेक भागात विद्युत प्रवाह सोडला जातो किंवा विषारी औषधांचा वापर केला जातो त्यातून प्राणीमात्रांना देखील हानी होते.

या सर्व बाबींचा सरकारने गांभीर्याने विचार करून सामुदायिक पद्धतीने किंवा संयुक्तरित्या शेताला तार कंपाउंड करण्यासाठी अनुदान योजना सुरू करण्याची गरज आहे या योजनेद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावर भक्कम असे तारेचे कुंपण करता येईल.
त्यासाठी सरकारने स्वतंत्र निधीची तरतूद करून अनुदान उपलब्ध करून द्यावे असे मत महाराष्ट्रातील प्रसिद्ध कृषीतज्ञ तसेच नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस सचिन आत्माराम होळकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
याबाबत अनेक आमदार,मंत्री तसेच उच्चपदस्थ अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून या गोष्टीचा वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्यात येईल असे होळकर यांनी सांगितले.



