आंबेडकरी शाहिरीचा बुलंद आवाज शांत; लोकशाहीर प्रसाद अंतरवेलीकर काळाच्या पडद्याआड
न्यायभूमी संस्थापक अभय पाटील

न्यायभूमी
खेडलेझुंगे दि. १० फेब्रुवारी / बाबा गिते
महाराष्ट्रातील ख्यातकीर्त ‘लोकशाहीर’ प्रसाद अंतरवेलीकर (शिवप्रसाद सदाशिव गांगुर्डे) वय ७४ यांचे दिनांक ७ फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्यांच्या रूपाने आंबेडकरी विचाराचे प्रबोधन चळवळीत आपल्या लेखणी व अभिनयाने शाहिरी परंपरा चालवणारा शाहीर कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे.
निफाड तालुक्यातील अंतरवेली या छोट्याशा गावातून प्रसाद अंतरवेलीकर यांनी वयाच्या १० व्या वर्षपासून कलेच्या क्षेत्रात प्रवास सुरु केला. सन १९७० पासून त्यांनी सोबत्याना घेऊन किसान कलापथक स्थापन केले. नंतर ओझर येथील लोकरंजन कलापथकात ते सामील झाले.
भावगीत,लोकगीत,लावणी,पोवाडा,लोकनाट्य, नाटक, मराठी चित्रपट पटकथा,संवाद गीते या कलाप्रकारांचे लेखन केले.दरम्यानच्या काळात स्वतःच्या ग्रामीण तमाशाची व कव्वाल पार्टी आणि भीम जलसाची देखील त्यांनी निर्मिती केली.
गीत गायन आणि नाटक,दूरदर्शनवरील कार्यक्रम, लोकनाट्य व चित्रपटातही त्यांनी अभिनय केला.संत जनार्दन स्वामींची गाणी त्यांनी कॅसेट मध्ये आणली.खलनायकाची भूमिका प्रभावीपणे ते
वठवत असत.प्रल्हाद शिंदे,विठ्ठल उमप यांच्यासोबत त्यांनी कार्यक्रम केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित ‘असे होते बाबा’ हा जलसा ते करायचे.स्व.निळू फुले यांच्यासह अनेक कलावंतांनी त्यांना चित्रपट क्षेत्रात येण्याची ऑफर दिली पण ती नाकारून, मी चंदेरी दुनियेत गेलो तर माझी शेती माती यापासून दूर जाईल त्यामुळे मातीतच राहून लिहीत राहील ही भूमिका त्यांनी अखेरपर्यंत ठेवली.
महाराणा प्रताप यांच्यावरील त्यांनी लिहिलेला पोवाडा शाहीर विजय तनपुरे यांनी लोकप्रिय केला. भक्तीगीत,भजन व इतर कलेच्या १० ते १५ कॅसेट त्यांच्या प्रसिद्ध झाल्या आहेत. स्व. यशवंतराव चव्हाण ते शरद पवार,छगन भुजबळ यांच्या प्रचार सभांच्या पूर्वी होणाऱ्या सादरीकरणात प्रसाद तनपुरे हे लोकांचे मनोरंजन करत. मागच्या वर्षी त्यांनी तमाशा या कला प्रकारचा अभ्यास करून लिहिलेल्या ‘ तमाशाचा तमाशा’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.एक ग्रामीण कादंबरी त्यांनी लिहिली असून तिचे प्रकाशन बाकी आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले,दोन मुली असा परिवार आहे.अंतरवेली येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी राजकीय,सामाजिक आणि कला क्षेत्रातील मान्यवरांसह नातेवाईक उपस्थित होते.



