विंचूर येथील अंगणवाडीची दयनीय अवस्था; लहान मुलांच्या जीविताला धोका,जबाबदार कोण ?
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
विंचूर दि ०७ ऑगस्ट प्रतिनिधी राहुल गलाडे
येथील चव्हाण वस्ती येथील अंगणवाडी सध्या अत्यंत दुर्लक्षित अवस्थेत असून,लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
या अंगणवाडीत स्लॅबच्या सर्व बाजूंनी पाणी गळते आहे.पावसाळ्यात छतातून गळणारे पाणी थेट मुलांच्या बसण्याच्या ठिकाणी पडते.
याशिवाय, जमिनीवरील फरशा तुटलेल्या असून त्यावरून घसरून अनेक मुलांचे हातपायही जखमी झाले आहेत.
केवळ वर्गखोलीच नव्हे, तर शौचालयाचीही अवस्था अतिशय वाईट असून,पावसाळ्यात मुलांना उघड्यावर शौचासाठी जावे लागते. स्वच्छतेचा अभाव आणि मूलभूत सुविधांची कमतरता यामुळे आजारांचीही भीती निर्माण झाली आहे.

अंगणवाडीतील मदतनीस वैशाली चव्हाण यांनी या परिस्थितीबाबत ग्रामपंचायत कार्यालय, विंचूर येथे वारंवार तोंडी तसेच लेखी स्वरूपात तक्रारी दाखल केल्या आहेत.

मात्र अद्यापपर्यंत कोणतीही ठोस कारवाई किंवा दुरुस्तीचे काम झालेले नाही.या अंगणवाडीमध्ये दररोज येणाऱ्या चिमुकल्यांच्या सुरक्षेबाबत पालकांमध्ये तीव्र संताप आणि चिंता आहे.
जर भविष्यात या दुर्लक्षामुळे एखादा अपघात झाला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार,असा सवाल उपस्थित होत आहे.
ग्रामपंचायतीने याची तातडीने दखल घेऊन दुरुस्तीची कार्यवाही करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

◆ दररोज अंगणवाडीत येणारी ही चिमुकली मुलं म्हणजे आमची जबाबदारी आहे.गळती, तुटलेल्या फरशा,उघडे टॉयलेट या सगळ्यात त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतोय.आम्ही वेळोवेळी तक्रारी दिल्या,पण अजून काहीच झालेलं नाही. उद्या एखाद्या मुलाला काही झालं, तर जबाबदारी कुणाची? आमचा आवाज प्रशासनाने ऐकायलाच हवा..
वैशाली चव्हाण,
अंगणवाडी मदतनीस
लवकरात लवकर जर अंगणवाडीचे शौचालय व फरशी यांचे काम झाले नाहीत तर आम्हाला आंदोलन करावे लागेल आमच्या मुलांच्या जीवदास धोका आहे यास जबाबदार कोण
प्रतिक्रिया अविनाश चव्हाण
आमच्या चव्हाण वस्तीवरील अंगणवाडीची दुरावस्था खूपच वाईट आहे मुलांना शौचास पावसाळ्यात बाहेर जावे लागतात लवकरात लवकर काम जर पूर्ण झाले नाही तर आम्ही अंगणवाडीला कुलूप लावू
प्रतिक्रिया:- सोमनाथ क्षीरसागर



