शांतीनगर चौफुलीवर वाहतुकीचा फज्जा; दोन ते तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा
न्यायभूमी संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
नासिक जिल्हा दिनांक.०४ जुलै कैलास उपाध्ये
निफाड शहरातील शांतीनगर चौफुली येथे आज नाशिक – छत्रपती संभाजीनगर महामार्गावर आज दि.४ जुलै रोजी मोठी वाहतूक कोंडी झाल्याने वाहनचालक व प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
नाशिक – छत्रपती संभाजीनगर महामार्ग तसेच सुरत – शिर्डी मार्गावर वाहनांच्या तब्बल दोन ते तीन किलोमीटर लांबीच्या रांगा लागल्याने वाहतुकीचा पूर्णतः फज्जा उडाला.
सध्या निफाड शहरातून जाणाऱ्या नाशिक – छत्रपती संभाजीनगर महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे.त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरात वाहतूक कोंडीची समस्या वारंवार निर्माण होत असून, आज त्याची तीव्रता अधिक जाणवली.
या मार्गावर शाळा,महाविद्यालये,न्यायालय,बँका, नगरपंचायत,पंचायत समिती,विविध शासकीय कार्यालये तसेच मार्केट कमिटी असल्याने नागरिकांची मोठी वर्दळ असते.
त्यातच रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीचा ताण वाढून सर्वसामान्य नागरिक,विद्यार्थी,कर्मचारी व व्यापाऱ्यांना मोठा फटका बसत आहे.वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनालाही मोठी कसरत करावी लागत आहे.
निफाडकरांनी रस्त्याचे काम तातडीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करून वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
• महामार्गाचे काम असेच संथ गतीने सुरू राहिले तर निफाड चौफुलीवर दररोज वाहतूक कोंडी होणार.नागरिकांना हॉस्पिटल,शाळा,कार्यालय, लग्नसमारंभ तसेच इतर महत्त्वाच्या कामांसाठी वेळेत पोहोचणे कठीण होईल.प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
– विजय धारराव, निफाड


